मोबाईलसह एकाला अटक
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहर व परिसरात पुन्हा एकदा मटका जुगाराचा अवैध धंदा सक्रिय झाल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. कंवडातळे परिसरात मटक्याचे आकडे घेत असलेल्या एका व्यक्तीला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी मटक्याचे आकडे घेत असताना खलील नामक व्यक्तीला गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली होती. या कारवाईदरम्यान मटका घेणाऱ्या गणेश गायकर नामक व्यक्तीचे नाव समोर आले होते. त्यानंतरही शहर व परिसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कंवडातळे येथे कारवाई करत ज्ञानेश्वर तुकाराम पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मटक्याचे आकडे घेण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल आढळून आला. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीकडून 1 हजार 800 रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 5 हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पेण शहरातील विविध व्यक्तींकडून पैसे स्वीकारून त्यांना ‘कल्याण’ नावाच्या अवैध जुगाराचे आकडे देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात जमा होणारी जुगाराची रक्कम मुकणे पूर्ण नाव माहिती नाही, रा. कल्याण याच्याकडे दिली जात असल्याची माहितीही तपासात समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या कारवाईमुळे पेण शहरात मटका जुगाराचे जाळे पुन्हा सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणामागे आणखी कोणकोण व्यक्ती कार्यरत आहेत, तसेच या अवैध व्यवसायाचे सूत्रधार कोण आहेत, याचा तपास पेण पोलीस करीत आहेत. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.







