| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड-पाली येथील प्रतीक जाधव याने स्वीपर संघाचे दमदारपणे नेतृत्व करून नासाच्या जागतिक इव्हेंटमध्ये अवकाशाला गवसणी घालणारी दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या या कृतीने रायगड जिल्ह्याचे नाव जगभरात लौकिक झाले असून सुधागड-पालीच्या शिरपेचात देखील मानाचा तुरा खोवला गेला आहे. या स्पर्धेत 18,860 संघाचा सहभाग असून 167 देशातील 1,14,094 स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील इस्त्रोसह 14 स्पेस एजन्सी पार्टनर असून यात प्रतीक जाधवच्या ॲस्ट्रो स्विपर्स संघाने ‘2025 ग्लोबल विजेता’ असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले आहे. त्यामधून ग्लोबल टॉप टेन संघाची निवड करण्यात आली व त्या टॉप टेनमधून प्रथम क्रमांकाचा भारतीय इनोव्हेटरच्या ॲस्ट्रो स्वीपर्स संघाने ‘गॅलॅक्टिक इम्पेक्ट’ विजेतेपद पटकावले आहे. नासा इंटरनॅशनलस्पेस चैलेंज हा जगातील सर्वात मोठ्या नाविन्यपूर्ण हॅकेथॉनपैकी एक आहे. ‘गॅलॅक्टिक इम्पेक्ट’ हा पुरस्कार जागतिक स्थरावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात, अशा संघाला दिला जातो. या पुरस्काराचे मानकरी प्रतीक जाधव व त्यांचा संघ ठरला आहे. या संघाने ‘ॲस्ट्रो स्वीपर रिस्क इंडेक्स’ नावाचा एक समग्र स्कोरिंग फ्रेम वर्क विकसित केला आहे. प्रतीकने भारताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविल्याने त्याच्यासह ॲस्ट्रो स्वीपर संघाचे सर्व स्थरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






