प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचे निधन

। कोल्हापूर । प्रतिनिधी । 
रसायनशास्त्रातली उच्चपदवी घेऊन त्यांनी संशोधन सुरू केले. ऑक्सिजन, हायड्रोजन (oxygen, hydrogen)अशा वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्याव्दारे रेल्वेही (Railway)धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले आणि जाताजाताच इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात (Research of Platinum)आंतरराष्ट्रीय स्तरावर सात पेटंटही मिळवले. ऑक्सिजन क्षेत्रातील हा गुरूतुल्य माणूस कोरोनाचा लक्ष्य ठरला आणि ऑक्सिजनचा सुक्ष्म गुणधर्म शोधणाऱ्या अवलियाला अटीतटीच्या क्षणी ऑक्सिजनच मिळू शकला नाही. यातच चेन्नईत ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र काकडे (Dr. Bhalchandra Kakade)यांचा मृत्यू झाला.

जीवघेण्या आजारात ऑक्सिजनची संजीवनी देऊन जीवदान देणाऱ्या हा दिग्गज संशोधक वयाच्या ४४ व्या वर्षातच ऑक्सिजनच्या कमतरतेचा बळी ठरला, ही आगळी शोकांतिका शिक्षण क्षेत्रालाच नव्हे तर तमाम कोल्हापूरकरांनाही चटका लावणारी आहे.

डॉ. काकडे चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्सिट्युटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पत्नीही तेथेच संशोधनकार्य करत आहेत. तेथे लॅबमध्ये काही पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्यांचीही टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन तीन दिवसांतच त्यांना श्वसनास त्रास सुरू झाला. त्यांच्या विद्यार्थ्यानी शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांना ऑॅक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी धडपडत करत राहिला.

ऑक्सिजनच्या दिग्गज संशोधकाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पण त्या प्रयत्यांनाही अपयशच पाहावे लागले. डॉ. काकडे हे शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेऊन फेलोशीप मिळवून पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा, जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन केले. त्यातून निर्माण होणार्या सकारात्मक ऊर्जेने रेल्वे धावू शकेल, याचा ध्यास घेतला. वीस वर्षे त्यांनी या संशोधनात व्यतित केली. इतक्यात कोरोनाच्या काळाकुट्ट संसर्गाने त्यांनाच हिरावून नेले आणि कोल्हापूरच्या संशोधकाने जगाचे लक्ष वेधावे, अशा कर्तृत्वाचा संशोधक हिरावल्याचे दुखः पचवावे कसे, अशी भावना संशोधकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Exit mobile version