बनावट ई पासने जिल्ह्यात येणारे पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

बनावट ई-पासव्दारे कराडहून रत्नागिरी जिल्ह्यात येणार्या वाहनावर मुंबई-गोवा महामार्गावरील कुंभार्ली तपासणी नाक्यावर सोमवारी कारवाई करण्यात आली.याप्रकरणी अलोरे शिरगाव पोलिसांनी पुष्पक नरसिंग शिंदे(24,रा.नांदिवसे राधानगर चिपळूण),गाडीमालक रोशन सुरेश शिंदे (रा.कळवणे) आणि गाडीचालक रेवण दत्तात्रय अडसूळ (23,रा.दादर,गावठाण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ई-पासव्दारे प्रवेश केल्याप्रकरणी हा तीसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 8 जणांवर बनावट ई-पासप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाबंदी करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवेसाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात येणार्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.कुंभार्ली तपासणी नाक्यावर पोलीस उपनिरीक्षक धनश्री करंजकर व अलोरे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार विजय केतकर पोलीस हवालदार स्वप्निल साळवी,होमगार्ड यशवंत धांगडे,आदित्य कुळे,व आरोग्य सेवक,शिक्षक यांच्यासमवेत वाहनांची व ई-पासची तपासणी करीत होते.तपासणीदरम्यान कराडहून पांढर्या रंगाची इर्टिका कार आली.या गाडीवर असलेला पास बनावट असल्याचा पोलिसांना संशय आला.त्यांनी तो पास क्युआर कोडने स्कॅन केल्यानंतर तो स्कॅन झाला नाही.त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयातील सायबर सेलची मदत घेतल्यानंतर तो पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक धनश्री करंजकर यांनी तक्रार दिली.या तक्रारीनुसार अलोरे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version