| चिरनेर | प्रतिनिधी |
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून किम्बर्ली-क्लार्क इंडिया आणि युनिसेफ इंडिया यांनी भारतातील महिला व मुलींच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी एका धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. ‘बेटर केअर फॉर अ बेटर वर्ल्ड’ या संकल्पनेवर आधारित ही मोहीम महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातसह देशातील एकूण नऊ प्रमुख राज्यांमध्ये राबवली जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे सुमारे 2.88 दशलक्ष किशोरवयीन मुली, महिला आणि अर्भकांच्या आरोग्यात सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केवळ उपचारच नव्हे, तर मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता, प्रसूतीपूर्व व नंतरची काळजी आणि बालसंगोपन या विषयांवर 2.87 दशलक्ष समाजघटकांचे प्रबोधन केले जाणार आहे. ही युती केवळ आरोग्य सेवा पुरवण्यापुरती मर्यादित नसून, ती ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर देणार आहे.
किम्बर्ली-क्लार्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल अस्थाना यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, आरोग्य आणि सन्मान हा कोणा एकाचा विशेषाधिकार नसून तो सर्वांचा हक्क आहे. युनिसेफसोबतची आमची ही भागीदारी महिलांच्या जीवनात दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहे.
युनिसेफ इंडियाच्या प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे यांनी विकसित भारत या संकल्पनेचा उल्लेख करत स्पष्ट केले की, मुलींचे आरोग्य, मातांचे कल्याण आणि बालकांचा विकास हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. या उपक्रमामुळे मुलींना स्वतःच्या आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. ज्यामुळे देशाच्या लैंगिक समानता आणि सार्वजनिक आरोग्य ध्येयांना गती मिळेल. या ऐतिहासिक भागीदारीमुळे भारतातील दुर्गम भागातील महिलांना आता अधिक सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगता येणार आहे.







