। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली-मांडला येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. सिकलसेल पांढरे कार्ड निरोगी रुग्णांना देण्यात आले.
यावेळी तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा यांनी सिकलसेल आजाराविषयी सविस्तर माहिती सांगताना म्हणाले की, सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्त पेशींचा आकार गोल व लवचिक असतात पेशींचे आयुष्य 120 दिवस असते. पण सिकलसेल आजारामध्ये या पेशींना ऑक्सिजन मिळाला नाही तर विळ्यासारखा होतो. सिकलसेल पेशींचे आयुष्य हे 20 ते 30 दिवस असते. इंग्रजी भाषेत सिकल म्हणजे विळा आणि सेल म्हणजे पेशी म्हणून या आजारास सिकलसेल आजार असे म्हणतात. सिकलसेल हा लाल पेशीमध्ये होणारा आजार आहे.
सिकलसेल रुग्णांमध्ये रक्तक्षय कमी असणे, अशक्तपणा, हातापायावर सुज येणे, कमरेची व सांधेदुखी काविळ, पक्षघात, पित्ताशय न भरून येणार्या जखमा, मूत्रपिड निकामी होणे, डोळ्यांवर परिणाम होणे, असह्य वेदना, जंतुसंसर्ग, शारीरिक त्रास मानसिक त्रास अशी लक्षणे आढळतात.
सिकलसेल सोल्युबिलिटी टेस्ट ही चाचणी जिल्हा सामान्य रूग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मोफत तपासणी केली जाते तरी रुग्णानी यांचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा यांनी केले.
डॉक्टरचा सल्ला घेणे, अँटिबायोटिक, हायड्रॉक्सीयुरिया गोळ्या घेणे, रक्त वाढीसाठी फॉलिक असिडच्या गोळ्या नियमित घेणे, सिकलसेल रुग्णांनी अति परिश्रम कामे न करणे, वेळीवेळी विश्रांती घेणे, आहारामध्ये पालक, बिट, गुळ, शेंगदाणे, डाळिंब, शेवंगाची भाजी, काळे मनुके, खजूर, मासे, अंडी, संत्री, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य पदार्थ खाणे आवश्यक आहे, असे यावेळी डॉ. पायल राठोड यांनी सांगितले.