| माथेरान | प्रतिनिधी |
बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सैय्यदना मफद्दल सैफुद्दिन यांच्या पुढाकाराने माथेरान शहरात एक महिनाभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दि.16 मार्चपासून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण कार्यासाठी नगरपरिषदेचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. प्रत्येक प्रभागात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले आहे.
माथेरानमध्ये नुकताच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीसदस्यांमार्फत संपूर्ण गावात अशाचप्रकारे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी जवळपास पाच टनांपेक्षाही अधिक प्रमाणात सुक्या कचऱ्याचे संकलन करण्यात आले होते. बोहरा समाजाच्या माध्यमातून महिनाभर स्वच्छता मोहीमेस सुरुवात झाल्यामुळे याच माध्यमातून जवळपास शंभर आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होत आहे.
सद्यस्थितीत बोहरा समाजाने विविध ठिकाणी जुने बंगले खरेदी करून त्याजागी आलिशान वास्तू उभारल्या जात आहेत. त्यातील कच कॅसल या बंगल्यापर्यंत मातीचा रस्ता आहे. येथील वखारी नाका ते कच कॅसल बंगला आणि पुढील काही भागापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे पायी चालत जाताना खूपच त्रासदायक बनले आहे. हा रस्ता सुध्दा बोहरा समाजाने स्वखर्चाने बनविल्यास पर्यटकांना, नागरिकांना आणि बोहरा समाजाच्या लोकांना बंगल्यापर्यंत जाण्यासाठी आणि पर्यटकांना नागरिकांना रहदारीसाठी उत्तम ठरू शकतो. त्यासाठी या समाजाने पुढाकार घ्यावा, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.







