| नेरळ | प्रतिनिधी |
दामत ग्रुप ग्रामपंचायतीमधील भडवळ येथील धनगरवाडी-कातकरवाडी येथील रस्त्याचे मंजूर काम केले जात नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी 12 जानेवारी पासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उपोषणाच्या इशाऱ्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या कामाचा नारळ फोडला असून लवकरच काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले आहे.
धनगरवाडी आणि कातकरवाडीला मुख्य गावाशी जोडणारा रस्ता अद्याप तयार झालेला नाही. या रस्त्या अभावी दैनंदिन जीवनात अत्यंत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची स्थिती अतिशय बिकट होते. खराब रस्त्यामुळे आजारी रुग्ण, गरोदर महिला आणि शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. इतकेच नव्हे तर शेतीमाल, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणेही अशक्य झाले आहे.
रस्त्याचे काम करण्यात यावे यासाठी स्थानिक ग्रामस्थ सतत पाठपुरावा करीत आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकवेळा संबंधित कार्यालयात तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या आहेत. रस्त्याचे काम करण्यासाठी भूमिपूजन सोहळा शिवसेना शिंदे गटाने पूर्ण केला असून, अशा कार्यक्रमाने रस्त्याचे काम खरोखरच पूर्ण होणार काय? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. निवडणुका जवळ आल्या असून स्थानिक ग्रामस्थांना खुश करण्यासाठी नारळ फोडला आहे काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.






