| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत भोस्ते येथे ग्रामस्थ व श्रीवर्धन येथील महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी (दि.8) वनराई बंधाऱ्याचे बांधकाम व वृक्षारोपण करण्यात आले.
लोकसहभाग व मेहनतीने वनराई बंधाऱ्याचे बांधकाम केले असून, या स्तुत्य उपक्रमातून झालेल्या बंधाऱ्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला एक नवीन स्त्रोतांची संजिवनी मिळाली आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करीत असताना लोकसहभाग हा खुप महत्वाचा असून, त्यातूनच गावाचा विकास होत आहे असे प्रतिपादन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणेश जावळेकर यांनी केले. तसेच, या उपक्रमातून ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानात आपली चांगली छाप सोडेल असे प्रतिपादन माजी सदस्य संतोष रटाटे यांनी केले.
शासनाने वृक्ष लागवाडी करिता दिलेल्या आदेशानुसार लोकसहभागातून लागवड करण्यात आलेल्या आंबा, नारळ, चिकू, काजू व सुरू या झाडा भोवताली आलेल्या गवत व इतर छोट्या झाडांची बेनणी करण्यात आली व वृक्षांना खते ही लावण्यात आली तसेच ठिबक सिंचन करून पाण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमा मध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य योगेश लोखंडे, शिक्षक, विद्यार्थ्यांनी तसेच गाव समाज अध्यक्ष आणि प्रमुख मंडळी, ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.







