हॉटेल-केटरर्स प्रांताधिकाऱ्यांच्या दारात
। महाड । प्रतिनिधी ।
आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता स्थानिक पातळीवरही तीव्रतेने जाणवू लागला आहे. महाड तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आणि केटरर्स यांच्यावर या गॅस टंचाईचे मोठे संकट कोसळले असून, अनेक ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त व्यावसायिकांनी प्रांताधिकाऱ्यांकडे धाव घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महाडमधील हॉटेल व केटरर्स संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.30) उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेण्यात आली. यावेळी व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडत किमान मर्यादित प्रमाणात तरी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. “गॅस मिळाल्याशिवाय व्यवसाय सुरू ठेवणे अशक्य आहे, अन्यथा हॉटेल बंद ठेवावी लागतील,” असा इशारा त्यांनी दिला.
काही भागात मर्यादित गॅस पुरवठा सुरू असल्याचे उदाहरण देत, महाडमध्येही तशीच व्यवस्था राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेषतः केटरिंग व्यावसायिकांची परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. लग्नसमारंभ व विविध कार्यक्रमांसाठी आधीच ऑर्डर्स घेतलेल्या असताना, गॅसअभावी सेवा देणे कठीण झाले आहे.
पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी अनेक सभागृह व्यवस्थापनांकडून त्याला परवानगी मिळत नाही. काही जण डिझेल भट्ट्यांचा वापर करत असले तरी इंधन मिळण्यातही अडचणी येत आहेत. पेट्रोल पंपांवर कॅन किंवा ड्रममध्ये डिझेल देण्यावरील निर्बंधांमुळे हा पर्यायही मर्यादित ठरत आहे. या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन किमान गॅस पुरवठा सुरू करावा, अशी मागणी संघटनेने केली.
दरम्यान, प्रांताधिकारी पोपट ओमासे यांनी स्पष्ट केले की, जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गॅस टंचाई भासत असून सध्या उपलब्ध गॅस प्राधान्याने रुग्णालये, वसतिगृहे, आश्रमशाळा आणि शासकीय योजनांसाठी वितरित केला जात आहे. परिस्थिती सुधारताच व्यावसायिकांसाठीही गॅस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी संघटनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून, मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.






