क्रांतीभूमीला अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज; शतक महोत्सवी वर्षाची सुरुवात
| महाड | प्रतिनिधी |
महाड येथील चवदार तळ्यावर पाण्यासाठी सत्याग्रह करून अस्पृश्यतेविरोधात ऐतिहासिक लढा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 99 वर्षापूर्वी पुकारला होता. महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या क्रांतीभूमीला अभिवादन करण्यासाठी लाखो भीमअनुयायी शुक्रवारी (दि.20) महाडमध्ये दाखल होणार आहेत. चवदार तळ्याचा परिसर भीमसृष्टीने आणि अनुयायींच्या जयघोषाने भक्तिमय होणार आहे. राजकीय, सामाजिक अशा विविध संघटनांच्या प्रबोधन सभा, शिबिरांचा समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महाडमध्ये सामाजिक समतेचा संदेश पुन्हा एकदा घुमणार आहे. या ऐतिहासिक लढ्याच्या शतक महोत्सवी वर्षाची सुरुवात करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून सामाजिक समतेसाठी ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी घटनेच्या स्मरणार्थ उद्या 20 मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रहाचा 99 वा वर्धापन दिन महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी महाडमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन आणि महाड नगरपालिका प्रशासनाकडून तयारी पुर्ण केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार सुनील तटकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, आदी आंबेडकरी नेतेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.20 मार्च रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत समता सैनिक दलाचे संचलन होणार आहे. त्यानंतर विविध संघटनांच्या अभिवादन सभा आणि जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चवदार तळे येथे रायगड पोलीस दलाकडून डॉ. आंबेडकरांना मानवंदना दिली जाणार आहे.
महाड येथील चवदार तळे येथे जाण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाडपासून महाड पर्यंत ठिकठिकाणी नास्त्यासह पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था वेगवेगळ्या सामाजिक संस्थामार्फत करण्यात आली आहे. महाडमध्ये दाखल होणाऱ्या भीम अनुयायींच्या वाहनांसाठी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध संघटनांच्या प्रबोधन सभा, शिबिरांचा समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महाडमध्ये सामाजिक समतेचा संदेश पुन्हा एकदा घुमणार आहे. दरम्यान भीमज्योतही महाडमध्ये काही संघटनाच्या वतीने काढण्यात येणार आहे. सफेद वस्त्र परिधान करून लाखो अनुयायी या क्रांतीभूमीमध्ये दाखल होणार आहे. या कालावधीत कोणताही गैरप्रकार, तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. कोलाडपासून ठिकठिकाणी वाहतूक पोलीस, महाड शहरात प्रवेश करताच ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 500 हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी तैनात असणार आहेत. चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
शुध्द पाण्यासाठी एक वर्षाची प्रतीक्षा
दरवर्षी महाड येथील चवदार तळे येथे वीस मार्चला भीम अनुयायी दाखल होतात. चवदार तळ्यातील पाणी ओंजळीमध्ये घेऊन महामानवाच्या विचारांना अभिवादन करतात. मात्र या तलावातील पाणी अशुध्द असल्याचे चित्र आहे. यावर्षी देखील तलावाचे पाणी शुध्द करण्यास महाड नगरपालिका अपयशी ठरली आहे. चवदार तळे आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामांचे भूमिपूजनही मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे चवदार तळ्यातील शुध्द पाण्यासाठी भीम अनुयायींना अजून एक वर्ष वाट पहावी लागणार आहे.





