प्राथमिक शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु
| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा रसायनी येथील महिला उद्योग मंडळ संचलित प्राथमिक शाळेवर रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाने कारवाई सुरू केली आहे. तसेच, या कार्यवाहीचे पत्र मुंबई येथील उपविभागीय शिक्षण संचालक यांना सादर केले आहे. ही शाळा 60 टक्के अनुदानित असून देखील विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर पद्धतीने मासिक फी घेत असल्याची माहिती मिळाली समोर आली होती. तसेच, ही शाळा विनापरवानगी जिर्ण इमारतीत स्थलांतरीत करून पालक आणि शिक्षण विभागाची फसवणूक करत असल्याचे आरोप देखील करण्यात आले होते. चौकशी दरम्यान शाळेवरील आरोप सिद्ध झाले असून या शाळेवर बंदीची टांगती तलवार लटकलेली दिसून येत आहे.
महिला उद्योग मंडळाच्या प्राथमिक शाळा ही 60 टक्के अनुदानित शाळा आहे. तरी देखील ही शाळा विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर पद्धतीने मासिक फी घेत असल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात राजिप प्राथमिक शिक्षण विभागातर्फे चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत ही शाळा विद्यार्थ्यांकडून फी घेत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, चौकशी दरम्यान शाळेच्या मुख्यध्यापकांनी देखील फी आकारत असल्याचे सांगितले. त्यामुळे शाळेवरील हे आरोप सिद्ध झाले असून याबाबत प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शाळेला नोटिस देण्यात आली आहे. तसेच, महिला उद्योग मंडळाची प्राथमिक शाळा विनापरवाना स्थलांतर केल्याचे देखील आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात संस्थेच कार्याध्यक्ष अरुण गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांनी गतवर्षी दि.8 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी, महिला उद्योग मंडळाची शाळा विनापरवानगी स्थलांतरीत करून पालक आणि शिक्षण विभागाची फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खालापूर गटशिक्षण अधिकारी यांनी दि.7 फेब्रुवारी रोजी चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशी दरम्यान, महिला उद्योग मंडळाची शाळा ही एचओसी कंपनीच्या जीर्ण होत असलेल्या धोकादायक अशा माणिक प्रबळ इमारतीमध्ये भरत असून ती विनापरवाना स्थलांतर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अशा संस्थेची मान्यता आपोआपच रद्द समजली जाते. सद्यस्थितीमध्ये या शाळेत पहिली ते आठवीचे 1,312 विद्यार्थी शिकत असल्याचे देखील गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. सध्या आनुदान वाचविण्यासाठीची धडपड म्हणून महिला उद्योग मंडळ संचलित प्राथमिक शाळेचे पराडे येथे बांधकाम सुरु आहे. याविरोधात अरुण गायकवाड आणि आकाश कांबळे यांनी ट्रस्टींविरोधात धर्मादाय आयुक्त अलिबाग आणि मुंबई येथे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाने पत्र व्यवहार करून शाळेवर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांना पत्र सादर केले असून शाळेवर बंदीची टांगती तलवार लटकलेली दिसून येत आहे.
मी या संस्थेवर काम करत असताना संस्थेमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराची माहिती मिळाली. परंतु, त्यासंदर्भात संस्थेला याची कल्पना देऊनसुद्धा संस्थेने त्यावर कोणताही विचार न करता भ्रष्टाचार सुरू ठेवला. त्यामुळे मी धर्मादाय आयुक्त रायगड जिल्हा यांच्याकडे हे मंडळ बरखास्त व्हावे, अशी मागणी केलेली आहे. तसेच, या संस्थेबाबत केंद्र प्रमुखांनी देखील बघ्याची भूमिका घेतलेली दिसून येत आहे. त्यामुळे अशा बेजबादार केंद्र प्रमुखांवर कार्यवाही करून त्यांना निलंबित केले पाहिजे. त्याचबरोबर जे दोषी आढळतील त्यांच्यावर सुद्धा राज्य शासन व संचालकांनी कारवाई केली पाहिजे.
-अरुण गायकवाड,
कार्याध्यक्ष, महिला उद्योग मंडळ
या शाळेची इमारत ही जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार धोकादायक असून देखील आज तागायत ही संस्था हजारो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या संस्थेची नोंदणी रद्द व्हावी, अशी शासनदरबारी मागणी करणार आहे.
-आकाश कांबळे,
सामाजिक कार्यकर्ता






