महिलांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत जनजागृती करण्यासाठी समाजसेविका शुभांगी सुरेश खरात व महिला ग्रुप यांच्या संकल्पनेतून विशेष योग व झुंबा सत्र आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम रविवार, दि. 8 मार्च रोजी सकाळी 6 ते 7.30 या वेळेत सेक्टर 26 येथील आदिनाथ बिल्डिंगसमोरील मोकळ्या मैदानात पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी दैनंदिन जीवनातील धावपळीमधून काही वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी द्यावा, हा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. योग हा प्राचीन भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग असून नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता, तणाव कमी होणे तसेच शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. कार्यक्रमात योगासने, प्राणायाम तसेच उत्साहवर्धक झुंबा सेशन घेण्यात येणार असून महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाजसेविका शुभांगी सुरेश खरात यांनी केले आहे. सहभागी होणाऱ्या महिलांनी पांढरा टी-शर्ट व काळी पॅन्ट किंवा त्यासारखा पोशाख परिधान करून उपस्थित राहावे, असेही आयोजकांनी कळविले आहे.





