| माणगाव | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी माणगाव तालुक्यात पोहोचताच संपूर्ण परिसर शोकमग्न झाला. क्षणातच हसते-खेळते माणगाव स्तब्ध झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही हा आघात सहन होणारा नव्हता. आपला माणूस गेला अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली. गुरवार दि.29 जानेवारी रोजी माणगावकरांनी कडकडीत बंद पाळून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
माणगाव शहरातील पाणीपुरवठा योजना, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, खारभूमी कार्यालय, नगरपंचायत इमारत, मुंबई-गोवा महामार्ग, माणगाव व इंदापूर बायपास, काळ व गोद नदीवरील पूल, द. ग. तटकरे महाविद्यालय, श्रीमती गीता तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग, अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय अशा असंख्य पायाभूत, शैक्षणिक आणि सामाजिक विकास कामांमध्ये अजितदादा पवार यांचे अमूल्य योगदान लाभले आहे. या प्रत्येक कामामागे दादांची दूरदृष्टी, जिद्द आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी दडलेली आहे. आज तो आधारवड अचानक हरपल्याने माणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते, तर अनेकांचे अश्रू मोकळेपणाने वाहत होते. अशा या लोकनेत्याला अखेरचा मान देण्यासाठी माणगाव तालुक्याने कडकडीत बंद पाळत, नतमस्तक होऊन, अश्रूंनी आणि ओल्या डोळ्यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.







