तीन डंपर, एक जेसीबी जप्त; भूमाफियांविरोधात मोठी कारवाई
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील वारे गावाच्या हद्दीतील फॉरेस्टलगत सर्व्हे क्रमांक 106 या परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध माती उत्खननावर वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. रात्री सुमारे एकच्या सुमारास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून तीन डंपर आणि एक जेसीबी ताब्यात घेत जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
जप्त करण्यात आलेली वाहने वन विभागाच्या पोई येथील डेपोमध्ये जमा करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरातील अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वारे परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या.
कर्जत तालुक्यात गेल्या काही काळात माती उत्खनन आणि वाहतुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून, रात्री उशिरापर्यंत डंपरची वर्दळ सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पर्यावरणाची हानी, रस्त्यांचे नुकसान तसेच स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
वन विभागाचे आरएफओ निलेश भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारच्या अवैध कृत्यांची माहिती संबंधित विभागांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन हे करण्यात येत आहे.