प्राणी मित्रांचा पुढाकार
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानमध्ये जंगल भागात मोठ्या प्रमाणात वन्यजीव असून, त्यांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासत असते. अशावेळी काही प्राणीमित्र पुढे आले असून, त्यांनी सिमेंट साच्या मधून बनवलेले पाण्याचे टब सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सुनील शिंदे यांना भेट दिले आहेत. साधारण 100 टब या प्राणी मित्रांकडून माथेरान मध्ये आणून देण्यात आल्याने माथेरानचे जंगलात प्राण्यांची पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था करण्यासाठी नगरपरिषद आणि वन विभाग यांच्याकडून व्यवस्था केली जाणार आहे.
माथेरानमध्ये 54 चौरस किलोमीटरमध्ये असलेल्या भूभागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. जंगलांनी व्यापल्याने ब्रिटिशांनी या ठिकाणी येऊन आपले राहण्याचे ठिकाण वसवले. त्याच जंगलात बिबट्यापासून सर्व प्रकारचे वन्य जीव असून, माकड तर जागोजागी दिसणारा प्राणी आहे. या सर्व प्राण्यांना जंगलात पाण्याची व्यवस्था होत नाही आणि नंतर ही प्राणी वन्यजीव लोकवस्तीत पाणी शोधत येत असतात. जंगलातील प्राण्यांना त्यांच्या अधिवासात पाणी मिळावे यासाठी प्राणी मित्र भाविन ठक्कर, संदीप कदम, संजय कोळी, प्रतीक ठक्कर यांनी पाण्याचे टब देण्याचा निर्णय घेतला. माथेरानचे जंगल भागात असंख्य वेळा भटकंती करणाऱ्या या प्राणी मित्रांना वन्यजीव यांची पाण्यासाठी धावपळ पहावी लागली आहे. त्यामुळे खास प्रकाराचे टब बनवून घेण्यात आले असून, सिमेंट साच्यामध्ये हे टब बनवले गेले आहेत. पाणी साठवून ठेवण्याचे साधारण 100 टब माथेरान बाजारपेठ येथे आणले गेले आहेत. माथेरान पालिकेचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांच्याकडे ते सर्व पाणी साठवून ठेवण्याचे टब देण्यात आले आहेत. हे सर्व संपूर्ण जंगलात ठेवण्यास सुरवात करण्यात आली असून, सुरू झालेल्या उन्हाळ्यात वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. जंगल तसेच बाजारपेठ भागात हे पाणी साठवून ठेवण्याचे टब प्राण्यांसाठी मदतगार ठरणार आहेत. बाजारपेठेत कुत्रे, घोडे मोठ्या प्रमाणात आहेत तर माथेरानच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत.
प्राणी मित्र..
माथेरान येथे अनेक पाण्याचे झरे आहेत ते पुनर्जिवीत करणार असल्याचे भाविन ठक्कर यांनी सांगितले माथेरानच्या अनेक प्राणीप्रेमीकडून या उपक्रमासाठी वेगवेगळी मदत मिळाली असल्याचे संदीप कदम यांनी स्पष्ट केले.







