। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईतील विविध भागात आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात पावसाच्या सरी बरसण्याचा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून पूर्व उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली.मुंबईतील जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, घाटकोपर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे ठाण्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसत असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना किंचितसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे काहींची तारांबळ उडाल्याचंही पाहायला मिळत आहे.केरळमध्ये मान्सूनचं आगमन 31 मेपर्यंत होणार होतं. पण ते 3 जूनपर्यंत लांबलं आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आठवडाभराच्या अंतरानं मान्सून महाराष्ट्रात धडक देईल अशी शक्यता आहे.