मुख्यमंत्र्यांचा घोटाळा लपविण्यासाठी गावबंदी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोर्लई येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगल्यांचा घोटाळा लपविण्यासाठी प्रशासनाने कोर्लई गावात अनिश्‍चित कालावधीसाठी गावबंदी आदेश लागू केले आहेत. मी जमीन घोटाळ्याबाबत आणखी खुलासा करणार असल्याने हे पाऊल प्रशासनाने उचलले असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला आहे. सोमवारी कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रशासनाने असा काढलेला आदेश अद्याप कुठेच काढला नसल्याचेही सोमैया यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लई येथे जमीन मालमत्ता आहे. ही जमीन खरेदी करताना आर्थिक घोटाळा झाला असून यामध्ये असलेल्या 19 बंगल्यांची माहितीही मुख्यमंत्र्यांनी लपवली असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. याबाबत सोमैया यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले होते. या घोटाळ्याबाबत तक्रार दाखल न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही सोमैया यांनी म्हटले आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली नाही.

कोर्लई येथील मुख्यमंत्र्यांच्या जमिनीचा आणि त्यातील 19 बंगल्याचा आणखी खुलासा करण्यासाठी सोमवारी किरीट सोमैया हे कोर्लई येथे येणार होते. मात्र आपण करणार असलेल्या खुलाशाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने कोरोनाचे कारण पुढे करून गावबंदी केली आहे. देशात सगळीकडे कोरोना आहे. मात्र असे नियम कुठेही लावले गेलेले नाहीत. कोर्लई येथे काढलेल्या आदेशानुसार शेवटचा व्यक्ती पूर्ण बरा होईपर्यंत पुढील 28 दिवस गावबंदी राहणार आहे. म्हणजे 100 ते 150 दिवस गावात जाण्यास बंदी राहणार आहे. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना होणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या जमीन घोटाळ्याचा विषय असल्याने हा सर्व प्रकार चालला असल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

Exit mobile version