| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड समुद्रकिनारी थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही परदेशी पाहुणे दाखल झाले आहेत. परंतु, पर्यटकांच्या रेलचेलीमुळे या परदेशी पाहुण्यांनी म्हणजेच सीगल पक्ष्यांनी स्थलांतर केले होते. सध्या समुद्रकिनारी शुकशुकाट पसरला असून, पुन्हा सिगल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. सीगल पक्ष्यांचा नोव्हेंबरपासून प्रजनन काळ सुरू होतो. त्यांचा पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असे रुपडे असलेल्या सिगल पक्ष्यांचा डौल असतो. हे पक्षी मुरूडच्या किनाऱ्यांवर प्रचंड संख्येने येत असतात. या पक्ष्यांना पाहण्यासाठी व आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी होत असते. परंतु, समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढत गेल्याने सिगल पक्षी जास्त काळ थांबु शकले नाहीत. सध्या पर्यटकांची रेलचेल थांबली असून दोन-तीन दिवसांपासून पुन्हा थंडीचा आनंद घेण्यासाठी सीगल पक्षी मुरूड किनारी दाखल झाल्यामुळे शहरातील सर्पमित्र व पक्षी प्रेमी संदिप घरत यांनी आनंद व्यक्त केला आहे.







