काळ बदलला तरी गावाकडची परंपरा कायम
| कापोली | प्रतिनिधी |
लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असून, गावागावांत बाप्पाच्या स्वागताचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आपल्या संस्कृतीत पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक आणि खमंग लाडू बनवण्याची पूर्वतयारी सध्या वेगाने सुरू आहे. आजच्या आधुनिक युगात बाजारात रेडीमेड मोदक पिठाचे ढीग साचले असले, तरी जी चव गावच्या अंगणात सुकवलेल्या तांदळाच्या पिठाच्या मोदकांना येते, ती दुकानातल्या पाकिटात बंद असलेल्या पिठाला कधीच येऊ शकत नाही, अशी ठाम भावना ग्रामीण भागातील गृहिणी व्यक्त करत आहेत.
सप्टेंबर महिन्यात खरतर ऊन-पावसाचा खेळ सुरु असतो. त्यामुळे इतर कामे बाजूला ठेवून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेडेगावांमध्ये महिलांची मोठी धावपळ सुरू असते. सध्या ऊन-पावसाचा लपंडाव सुरू असल्याने मोदकाच्या पिठासाठी तांदूळ सुकवताना महिलांची चांगलीच तारांबळ उडते. अचानक काळे ढग दाटून आले आणि पाऊस सुरू झाला की अंगणात वाळत टाकलेले तांदूळ घाईघाईने गोळा करून घरात भरून ठेवायचे, आणि पुन्हा कडक ऊन पडले की पावसाला दोष देत ते तांदूळ पुन्हा अंगणात वाळत टाकायचे, अशी लगबग घराघरांत पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागात आणि जुन्या पाड्यांवर अजूनही मोदकांचे पीठ घरच्या घरी तयार करण्याची परंपरा जपली जात आहे. बाप्पाच्या मोदकांसाठी खास सुवासिक आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ आणून ते स्वच्छ धुणे, त्यानंतर सुती कापडावर सावलीत सुकवणे आणि मग ते गिरणीतून अगदी बारीक दळून आणणे, अशी महिलांची लगबग सध्या पाहायला मिळत आहे. या घरगुती पिठामुळे मोदकांना एक वेगळीच चव आणि सुगंध येतो, अशी गृहिणींची भावना आहे.
दुसरीकडे, नोकरदार महिला आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आधुनिक काळात रेडीमेड मोदक पिठाची मागणी प्रचंड वाढली आहे. बाजारात मिळणारे नामांकित ब्रँड्सचे मोदक पीठ खरेदी करण्याकडे अनेकांचा कल आहे. यामुळे वेळ आणि कष्ट दोन्ही वाचत असल्याने, ऐन सणावारी कामाचा ताण कमी करण्यासाठी हा पर्याय सोयीचा ठरत आहे. बाजारात मिळणाऱ्या या पिठामुळे मोदक अगदी मऊ आणि कळीदार बनत असल्याने नवीन पिढीतील महिला या पर्यायाला पसंती देत आहेत. पारंपारिक पद्धत असो वा आधुनिक, बाप्पाच्या नैवेद्याची तयारी मात्र तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे. काळ बदलला आणि सोयी वाढल्या तरी गावाकडची परंपरा, ऊन-पावसाच्या खेळात तांदूळ सुकवण्याचा तो पारंपरिक आनंद, खेडेगावातील महिलांची लगबग हेच या गणेशोत्सवाचे खरे सौंदर्य आहे, जे आजही तितक्याच श्रद्धेने जपले जात आहे.





