| म्हसळा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे श्रीवर्धन, दिवेआगर आणि हरिहरेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. पुणे, मुंबई, सातारा, अहिल्यानगर, सांगली आदी विविध भागांतून हजारो पर्यटक खासगी वाहनांनी कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या वाढला आहे.
सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि वाहतूक सुरळीत चालवणे हे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. या परिस्थितीत श्रीवर्धन व म्हसळा पोलीस प्रशासनाकडून अत्यंत काटेकोर नियोजन राबविण्यात येत असून, पोलिसांची चांगलीच तारेवरची कसरत सुरू आहे. विशेषतः पर्यटकांची वाहने म्हसळा शहरात प्रवेश न करता थेट म्हसळा बायपास मार्गेच मार्गस्थ व्हावीत यासाठी म्हसळा पोलिसांकडून कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.
स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी बायपास रस्त्यावर पोलिसांचा सतत बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. गर्दीच्या वेळेत वाहनांचे वळवणे, मार्गदर्शन करणे तसेच अनावश्यक शहरप्रवेश रोखणे यावर विशेष लक्ष दिले जात आहे. या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे हे स्वतः बारकाईने लक्ष ठेवून परिस्थितीनुसार तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक असूनही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश येत आहे. दरम्यान पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीचा सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर ही दिसून येत आहे. म्हसळा बायपास रस्त्यावरील छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक तसेच टपरीवाले व्यावसायिक सध्या प्रचंड व्यस्त झाले असून, वर्ष अखेरीचा हा पर्यटन हंगाम त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.







