| रसायनी | प्रतिनिधी |
पाताळगंगा-रसायनी औद्योगिक परिसरातील मुख्य समस्या असलेल्या वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आणि रस्त्यांची दुरवस्था या प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने (मुंबई) पुढाकार घेतला आहे. या समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदने देण्यात आली.

प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून होणारी अवैध पार्किंग आणि खड्ड्यांमुळे झालेली रस्त्यांची चाळण, धोकादायक वळणावर लक्षवेधक फलक नसणे, यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांचा उपस्थितीत पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस व एम आयडीसी प्रशासनाला निवेदन दिले. याप्रसंगी राहुल जाधव, अर्जुन कदम, प्रतिक चाळके, पंढरीनाथ कुरंगळे यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







