रस्त्यांवरील अंतराचे दगड हरवले झुडपात

। माणगाव । प्रतिनिधी ।

रस्ते, महामार्गावरून प्रवास करीत असताना रस्त्याच्या बाजूला हमखास दिसणारे मैलांचे दगड अर्थात माईलस्टोन अनेक मार्गावरून गायब झाले आहेत. झाडेझुडपात लपले आहेत अथवा रंग उडालेले आहेत. काही ठिकाणी अंतरांचे अंक गायब झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना वाहक, चालक, पर्यटक, प्रवासी यांची गैरसोय होत आहे. दगडांवरचे रंग उडाल्यामुळे त्या रंगांचा अभिप्रेत असलेला अर्थ समजण्यास अडचणी येत आहेत.

रस्ते मार्गी प्रवास करताना रस्त्याच्या कडेला शहरे, गाव, पर्यटनस्थळे यांचे त्या ठिकाणावरून अंतर दाखविणारे दगड रस्त्याच्या कडेला लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून प्रचलित आहे. या अंतराच्या दगडांमुळे त्या-त्या ठिकाणचे अंतर समजते व पुढील प्रवासाची स्थिती, वेळ, काळ याची नेमकी कल्पना येत असते. मात्र गेल्या काही दिवसात अनेक रस्त्यांची पुनर्बांधणी, रस्ते रुंदीकरण अथवा दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्यांवरील हे अंतराच्या दगडांचे चिन्ह, माइल स्टोन गायब झाले आहेत. काही ठिकाणावरील दगडांच्या अंतराची अंक गायब झाले आहेत, रंग उडालेले आहेत अथवा झाडाझुडपात लपले गेले असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक प्रवासी पर्यटकांची गैरसोय होत असून शहराचे अंतर, ठिकाण, दिशा, रस्त्याचा प्रकार समजत नाही. त्यामुळे कधीकधी संभ्रम होऊन अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे अचूक माहिती जाणकारांना मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

अंतराचे दगड व त्यावरील रंगांचे महत्त्व.

नारंगी, पांढरा दगड

या रंगाने रंगविलेल्या दगडाचा अर्थ होतो की हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून निर्माण झाला असून हा रस्ता महामार्गापासून कोणत्यातरी गावाला जाणार आहे.

पिवळा, पांढरा दगड 

या रंगाने रंगविलेल्या दगडाचा अर्थ होतो हा राष्ट्रीय महामार्ग आहे.

हिरवा, पांढरा दगड –

या रंगाने रंगविलेल्या दगडाचा अर्थ होतो हा राज्य महामार्ग आहे.

निळा, पांढरा, काळा दगड – या रंगाने रंगविलेले दगड याचा अर्थ होतो या दगडा पासून एखादे मोठे शहर जवळ आहे.

पूर्वी रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याच्या कडेला हमखास अंतराचे दगड दिसायचे, त्यामुळे प्रवासाला किती वेळ लागेल हे कळायचे, रंगावरून रस्त्यांचा प्रकार ही कळायचा. मात्र, आजकाल हे दगड रस्त्याच्या कडेला दिसत नाहीत. दिसले तरी त्यावरील खुणा, अंक हरवले आहेत. त्यामुळे प्रवास करताना योग्य माहिती मिळत नाही.

 राम मोतीराम मदगे,

सामाजिक कार्यकर्ता, माणगाव.

Exit mobile version