शिपाई, चालकाच्या 97 पदांसाठी 5373 अर्ज
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत आयोजित पोलीस भरती प्रक्रिया अनेक तरुण-तरुणींसाठी आयुष्याला नवे वळण देणारी ठरत आहे. दि. 11 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे होणाऱ्या या भरतीकडे जिल्ह्यासह राज्यभरातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे. पोलीस वर्दी परिधान करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाईत या भरतीमुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भरतीत पोलीस शिपाई 94 पदे आणि चालक पोलीस शिपाई 3 पदे अशी एकूण 97 पदे भरण्यात येणार आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 3563 अर्ज, तर चालक पोलीस शिपाई पदासाठी 1810 अर्ज प्राप्त झाले आहेत. मोठ्या प्रतिसादामुळे भरती प्रक्रियेचे नियोजन अधिक काटेकोरपणे करण्यात आले आहे.
भरती प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने पार पडणार आहे. उमेदवारांची बायोमेट्रिक व फोटो पडताळणी, चिप रजिस्ट्रेशन, संपूर्ण मैदानावर कॅमेऱ्यांची नजर, प्रत्येक इव्हेंटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, तसेच 1600 मी., 800 मी. व 100 मी. धावांसाठी चिप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धा प्रकारासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या भरतीसाठी 42 पोलीस अधिकारी, 329 पोलीस अंमलदार आणि 36 मंत्रालयीन कर्मचारी तैनात असून, दि. 10 फेब्रुवारी रोजी बंदोबस्ताची रंगीत तालीमही पार पडली. भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला थारा दिला जाणार नाही. बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी हॉटेल, लॉजेस, निवास व्यवस्था पुरवठादार व मंगल कार्यालयांनी अल्पदरात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहे.
उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, कोणीही पैशांची मागणी करत असल्यास किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड येथे 02141-228473/222028 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही भरती प्रक्रिया केवळ नोकरीची संधी नसून, अनेक तरुण-तरुणींसाठी देशसेवेच्या मार्गावर पहिले पाऊल ठरणार आहे. रायगड जिल्हा पोलीस दलाकडून सर्व भावी पोलिसांना मनःपूर्वक शुभेच्छा.
– आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड





