| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील चणेरा भागातील खुटल येथील विट्भट्टीवर काम करणारी 25 वर्षीय विवाहित महिला आपल्या 10 व 7 वर्षांच्या दोन लहान मुलांसह बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या बाबत पती दिपक चंदर वाघमारे यांने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दिपक चंदर वाघमारे हा मूळचा राहणार मुरुड तालुक्यातील शीघ्रे नवीनवाडी येथील रहिवाशी असून, तो आपल्या बायको व दोन मुलांसोबत रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील खुटल येथील एका विटभट्टीवर मोलमजुरी म्हणून काम करत आहे. दि.13 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास खुटल येथून राहत्या घरातून पत्नी राजेश्री दिपक वाघमारे (25), विघ्नेश वाघमारे (10), योगेश वाघमारे (7) हे तिघेजण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. गेली चार महिने दोन मुलांसोबत पत्नी बेपत्ता असल्याची खबर रोहा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेश मोरे, महिला पोलीस हवालदार मंगल टेमकर पुढील तपास करित आहेत.