| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-मांडवा रोडवरील कनकेश्वर फाटा येथे लायन्स क्लब ऑफ अलिबाग-मांडवा यांच्यावतीने दि. 8 ते 12 जानेवारी या कालावधीत आयोजित भव्य लायन्स फेस्टिव्हलचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. पाच एकरांच्या विस्तीर्ण परिसरात भरलेल्या या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या सरखेल कान्होजीराजे आंग्रे व्यासपीठावरून मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.
या दिमाखदार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रथम प्रांतपाल प्रवीण सरनाईक, द्वितीय प्रांतपाल विजय गणात्रा, अलिबागचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रशांत नाईक, माजी प्रांतपाल अनिल जाधव, बोरिस-गुंजीस ग्रुपग्रामपंचायत सरपंच सदिच्छा पाटील, रिजन चेअरपर्सन गिरीश म्हात्रे आणि झोन चेअरपर्सन डॉ. रेखा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, पोयनाडचे अध्यक्ष गुरुनाथ माळी, डायमंड क्लब अलिबागच्या अध्यक्षा श्रृती सरनाईक, फेस्टिव्हल चेअरमन नितीन अधिकारी, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष ॲड. ऋग्वेद ठाकूर, सुबोध राऊत, अरविंद घरत, अमिष शिरगावकर, धवल राऊत, सुधीर पुरो, अभिजीत गुरव, हर्षद पाटील, अजय आंगणे, पंकज केसरकर, विद्या अधिकारी, मृदुला राऊत, मीनल ठाकूर, मोहन पाटील आणि प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी मांडवा लायन्स क्लबने आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलचे विशेष कौतुक केले. लायन्स क्लबने आपल्या विविध सामाजिक कार्यांतून अलिबागमध्ये स्वतःचा एक वेगळा आणि सकारात्मक ठसा उमटवला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फेस्टिव्हल चेअरमन नितीन अधिकारी यांनी प्रास्ताविक करताना क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध लावणी कलाकार, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते अश्मिक कामठे यांच्या बहारदार लावणीने झाली, तर शालेय नृत्य स्पर्धेने पहिल्या दिवसाची सांगता झाली. या पाच दिवसीय फेस्टिव्हलमध्ये खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू आणि सौंदर्य प्रसाधनांचे तब्बल 105 स्टॉल्स लावण्यात आले असून, मुलांसाठी खास अम्युझमेंट पार्क हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीम सुतार आणि सुमीत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन धवल राऊत यांनी केले.






