| अलिबाग | प्रतिनिधी |
एकाच घरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या गैरहजेरीचा फायदा घेत परिचिताने घरातील कपाटाची चावीने कुलूप उघडून तब्बल 19 लाख 50 हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना अलिबाग शहरातील पंतनगर येथे घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील पंतनगर येथील वेदांत अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 102 येथे दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे असून, ते एकाच घरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
फिर्यादी घरात नसताना आरोपीने घरातील कपाट चावीने उघडले. कपाटातील एकूण 19 लाख 50 हजार रुपये किमतीची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक पोलीस उपनिरीक्षक हंबीर तपास करीत आहेत.






