। पनवेल । प्रतिनिधी ।
बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी प्रकरणी सोमवारी 30 मार्च रोजी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. पनवेल तालुक्यातील वलप ग्रामपंचायतीच्या नावाखाली तब्बल 2660 जन्म-मृत्यू दाखल्यांचा घोटाळा रायगड जिल्ह्यात उघड झाला होता. यवतमाळ, जळगाव आणि नांदेड आदि ठिकाणी देखील हजारोंच्या संख्येने बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी दोन आरोर्पीना यापूर्वीच गजाआड करण्यात आले.
पनवेल तालुका पोलिसांनी संशयित आरोपींना यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. वलप ग्रामपंचायतीच्या नावाचा वापर या गुन्ह्यात कसा झाला, याचा शोध पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणातील तिन्ही संशयितांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत तर 22 वर्षीय संशयित आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एका दाखल्यासाठी 5 ते 10 हजार रुपये घेऊन हे संशयित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी करत होते. सीआरएस पोर्टलवरून जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी केली जाते. या पोर्टलमधील काही त्रुटींचा फायदा या सायबर गुन्हेगारांनी घेतला.






