| वारळ | प्रतिनिधी |
ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता महेंद्र पेरवी व उपसरपंच किरण काशिराम चाळके यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आवश्यक मतसंख्या न मिळाल्याने नामंजूर करण्यात आला. तहसीलदार सचिन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला. सरपंचांवर मनमानी कारभार व गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते तसेच उपसरपंच मुंबईत वास्तव्यास असल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सभेमध्ये या आरोपांबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. हातवर करून घेण्यात आलेल्या मतदानात एकूण 8 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी अविश्वासाच्या बाजूने तर 3 सदस्यांनी विश्वासाच्या बाजूने मतदान केले. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी किमान 6 मतांची आवश्यकता होती. एक मत कमी पडल्याने सरपंच व उपसरपंच यांच्याविरोधातील दोन्ही अविश्वास ठराव नामंजूर झाले. दरम्यान हा अविश्वास ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादातून आणण्यात आल्याची चर्चा आहे.






