मुख्य आरोपीला तळोजातून अटक
। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा परिसरात नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने टाकलेल्या धाडीत बांगलादेशी तरुणीचा वेश्या व्यवसायासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, अहमदाबादसह विविध शहरांमधील काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका करत तपास सुरू केला आहे.
तळोजा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनूसार, संबंधित ठिकाणी बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती सुरूवातीला मिळाल्यावर पोलिसांनी तळोजा येथील घोट गावालगतच्या कृष्णकुंज इमारतीमधील एका सदनिकेत तपासणी केली. या तपासणीत 25 वर्षीय नोयोन टोकिबोर शेख उर्फ आर्यन हा तरूण बांगलादेशी असल्याचे पोलिसांना आढळले. तसेच नोयोन याच्यासोबत अजून दोन तरूणी तेथे होत्या. या तरूणींच्या ओळखीसाठी त्यांची कागदपत्र आणि मोबाईल फोनची पडताळणी केली.
या पडताळणीत एक तरूणी ही मूळ बांगलादेशची असल्याचे समोर आले. मात्र, या तरूणीकडे आधारकार्ड व इतर ओळखपत्र सापडल्याने या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर पोलीस ही अवाक झाले. नोयोन याने या तरूणीला अहमदाबाद येथील अबावडी, बुधरापूर्व येथून आणल्याचे पोलिसांना सांगीतले. मात्र, पिडिता बांगलादेशी नागरिक असल्याचे माहिती असूनही नोयोन याने तिला पोलिसांच्या स्वाधिन केले नाही. तसेच त्या पिडितेकडून गेल्या वर्षी जून महिन्यापासून ते 15 मार्चपर्यंत नोयोन याने पिडित बांगलादेशी तरुणीकडून वेश्या व्यवसायासाठी वापरल्याचे पुरावे पोलिसांना नोयोन याच्या मोबाईलमध्ये सापडले.
तसेच अहमदाबाद येथे राहणारी एक 30 वर्षीय महिला तिच्या पतीने या तरुणीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच तिला वेश्या व्यवसायासाठी सातारा, नाशिक, जालना आणि रायगड अशा विविध जिल्ह्यात पाठवून तिच्याकडून मिळणारा मोबदला स्वतःच्या खात्यात घेत असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. नवी मुंबईचे पोलिसांनी यापुढे तपास करून या पिडितेकडून सातारा, लोणावळा, वडखळ, जालना तसेच इतर काही ठिकाणी ज्या ग्राहकांकडे पाठवले त्यांची सुद्धा चौकशी सुरू केल्यामुळे या पिडितेच्या असह्यतेचा फायदा उचलणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही संशयित आरोपींची नावे व मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खडके पुढील तपास करीत आहेत.







