। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलमध्ये वास्तव्यास असलेल्या 58 वर्षीय लेखा विभागातील अधिकाऱ्याची ऑनलाइन फसवणूक करत सायबर चोरट्यांनी तब्बल 1 कोटी 33 लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीला अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. काही तासांतच विश्वास संपादन करत संबंधितांनी विमा पॉलिसीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या पॉलिसी खरेदीच्या नावाखाली पीडिताला विविध बँक खाते क्रमांक देण्यात आले आणि त्या खात्यांवर रक्कम वळती करण्यास भाग पाडण्यात आले. चार जणांनी ही फसवणूक केली. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







