भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता हातातून निसटण्याची वेळ शिवसेना शिंदे गटावर येण्याची चिन्हे रायगडच्या राजकारणात दिसू लागली आहेत. रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेबाबत हालचाली वेगाने सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. या समीकरणामुळे सर्वाधिक सदस्य निवडून आणलेल्या शिंदे गटाला थेट विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड येत्या गुरुवारी (दि.12) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणार आहे. मात्र, या निवडीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे चित्र समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीत असतानाही शिंदे गटाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत भाजप आणि राष्ट्रवादीविरोधात स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. प्रचारसभांमध्ये एकमेकांवर तीव्र आरोप-प्रत्यारोप झाले. शिंदे गटातील काही आमदारांनी तर राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांना थेट आव्हान देत आक्रमक भूमिका घेतली होती. “तटकरेंचे दिवस संपले, आता जिल्ह्यात थोरवे, दळवी आणि गोगावलेच भारी,” अशा शब्दांत प्रचारसभांमध्ये जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरूनही राजकीय वातावरण तापले होते. आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी शिंदे गटातील काही आमदारांनी विविध पातळ्यांवर हालचाली केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या सर्व राजकीय घडामोडींमुळे आजतागायत रायगड जिल्हा पालकमंत्र्याविना असल्याची परिस्थिती कायम आहे.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत 59 पैकी शिंदे गटाने 21 जागांवर विजय मिळवत सर्वाधिक सदस्य निवडून आणले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला 16, भाजपला 15, शिवसेना ठाकरे गटाला पाच, तर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले. सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद शिंदे गटाकडेच जाणार, अशी जोरदार चर्चा निर्माण झाली होती. काही ठिकाणी त्यासंदर्भात जाहिराती आणि दावेही करण्यात आले होते. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापनेची शक्यता पुढे येताच शिंदे गटाचे संपूर्ण राजकीय गणित कोलमडल्याचे दिसत आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीपूर्वीच सत्तेच्या समीकरणात सामील होण्यासाठी शिंदे गटातील काही आमदारांनी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद सत्तेत स्थान मिळावे यासाठी स्थानिक नेत्यांपासून ते राज्यस्तरीय नेत्यांपर्यंत संपर्क साधला जात असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. काही ठिकाणी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, सध्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य सत्तास्थापनेच्या चर्चांमध्ये शिंदे गटाचे नाव फारसे दिसून येत नसल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. या दोन्ही पक्षांनी शिंदे गटाला दूर ठेवूनच सत्ता स्थापनेची रणनीती आखल्याचे संकेत राजकीय वर्तुळात मिळत आहेत. या सर्व घडामोडींमुळे सर्वाधिक सदस्य निवडून आणूनही शिंदे गटातील सदस्यांना विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरणार का, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







