। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनामुळे राज्य शासन जनतेला घराबाहेर पडू नका सांगत असताना राज्याचे मंत्री मात्र उद्घाटने कसली करीत फिरतात? पर्यटनाच्या जुन्याच कामांचे पैसे अजून जमा झालेले नसताना नवीन कामांची भुमीपूजन, उद्घाटने करुन जनतेची दिशाभुल करणे थांबवा असा टोला शेकापक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे.
श्रीवर्धन येथे पार पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर पंडित पाटील यांनी टिकास्त्र सोडले आहे. पंडित पाटील यांनी म्हटले आहे की, चक्रीवादळ तसेच लॉकडाऊनमुळे राज्याच्या मंत्र्यांनी आपले दौरे थांबूवन आता प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे. लोकांना सांगता घराबाहेर पडू नका आणि तुम्ही राजरोजपणे उद्घाटने करीत फिरता हे चुकीचे आहे. सुशोभिकरणापेक्षा आज हॉस्पिटलला सुविधा होणे सर्वाधिक गरजेचे आहे. त्यामुळे सौंदर्यावर भर देऊ नका तर ते पैसे हॉस्पिटलला वापरा असा सल्ला पंडित पाटील यांनी दिला आहे. त्यापेक्षा आयसीयु बेड उपलब्ध करुन द्या. श्रीवर्धनच्या सुशोभिकरणापेक्षा चक्रीवादळात झालेल्या नुकसानभरपाईला जास्तीत जास्त पैसे दिले असते तर बरे झाले असते असेही ते म्हणाले. मेकअपपेक्षा शरिर चांगले असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे आता माणसांच्या अस्तिवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तिकडे सर्वात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
जनतेची दिशाभुल थांबवा
31 मार्चला तारखेला शासनाने जीआर काढत शेकडो कोटींच्या कामांना परवानगी दिलेल्या कामांचे पैसे जमा करण्यात आले. मात्र सदर पैसे जमा झालेच नाही. त्यामुळे लोकांची दिशाभुल का करता तीन तीन वर्षे काम करुनही विद्यमान सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप पंडित पाटील यांनी केला आहे. राज्य सरकार कर घेऊन दिशाभुल करत असून नवीन उद्घाटने करत असल्यचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात आपण अनेक वेळ संबंधीत मंत्री महोदयांना फोन लावले, नियोजन अधिकारी यांची भेट घेतली मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही.
शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी देखील यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. शासनाने पर्यटनाचे पैसे रात्री 12 वाजून 8 मिनीटांनी जमा केले ते जमाच झाले नाही. ठेकेदारांचे मात्र केलेल्या कामामुळे नुकसान होऊन अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आधी केलेल्या कामाच्या उधारीचे पैसे द्या मगच नवी भुमीपूजने करा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.