प्लास्टिक वस्तूंवर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धनमधील वाढत्या पर्यटनासोबतच प्रदूषणदेखील वाढत आहे. शहरातील पर्यावरण संरक्षण, स्वच्छता तसेच समुद्रकिनाऱ्यांवरील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन नगर परिषदेकडून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर कडक बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार देशभरात काही विशिष्ट एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (सुधारित) नियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत ही कारवाई केली जात आहे. या नियमांनुसार 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग्ज, प्लास्टिकचे कप, प्लेट्स, स्ट्रॉ, कटलरी, स्टिक तसेच थर्माकोलच्या सजावटीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.
श्रीवर्धन हे किनारपट्टीलगतचे पर्यटनस्थळ असल्यामुळे पर्यटन हंगामात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. समुद्रकिनाऱ्यांवर साचणारा प्लास्टिक कचरा समुद्री जीवसृष्टीसाठी धोकादायक ठरत असून पर्यावरणीय समतोल बिघडवत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून ‘प्लास्टिकमुक्त श्रीवर्धन’ हा संकल्प हाती घेण्यात आला आहे. नगर परिषद प्रशासनाने व्यापाऱ्यांसाठी विशेष जनजागृती बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. कापडी व कागदी पिशव्या तसेच जैवविघटनशील पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
विशेष तपासणी पथकांची स्थापना
बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर, साठा किंवा विक्री आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्रथमच उल्लंघन झाल्यास दंड आकारला जाईल व माल जप्त करण्यात येईल. वारंवार नियमभंग करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात आली असून शहरात नियमित पाहणी केली जाणार आहे.
सहकार्य करण्याचे आवाहन
शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावेत. तसेच शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.







