। दांडगुरी । वार्ताहर ।
श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात एक नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देत पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
गरोदर मातांना प्रसूतीसाठी रुग्णवाहिके अभावी समस्या निर्माण होऊ नये याकरिता 102 जननी सुरक्षा या योजनेअंतर्गत उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे गरोदरमातांना प्रसूतीसाठी ने-आण करण्याकरिता रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या आमदार निधी 2020-2021 मधून लोकसेवेस एक रुग्णवाहिका अर्पण करण्यात आलेली आहे.
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या अधिकच वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आलेला आहे. अशा परिस्थितीत गरोदर मातांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेमुळे मातांना वेळेत उपचार होऊन लाखमोलाचे प्राण वाचले याकरिता श्रीवर्धन रुग्णालयात 102 जननी सुरक्षा या योजने अंतर्गत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेली असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, प्रांत अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, जिल्हा परिषद सदस्या प्रगती अदावडे, वैद्यकीय अधीकारी डॉ.मधुकर ढवळे, डॉ.महेंद्र भरणे, नगराध्यक्ष फैसल हुरजूक, माने मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.