भव्य मिरवणूक काढून आनंद साजरा; काही दिवसात ओरिसा राज्यात प्रशिक्षणासाठी
| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील धाटाव गावचा आणि मिरजमधील रॉयल ऑफिसर्स प्रेप्रोविरिटी अकॅडमीमध्ये शिक्षण घेऊन ध्येय गाठणारा विद्यार्थी श्रेयश उदय राणे याची भारतीय नौदलाच्या सिनियर सेलरपदी निवड झाली आहे. प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्दीच्या जोरावर प्रचंड मेहनत घेऊन श्रेयशने घेतलेल्या उत्तुंग भरारीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत असून, निवड झाल्याचे समजताच त्याच्या मित्र परिवाराने ढोल ताशाच्या वादनात वाजत गाजत त्याची भव्य मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
श्रेयश हा अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातून आलेला मुलगा आहे. श्रेयशचे वडील उदय आणि आई स्नेहल यांची मोलाची साथ त्याला शिकवीण्यात आधार ठरली. रोहा तालुक्यातील जगन्नाथ राठी समूहाच्या संस्थेत इंग्लिश मिडीयममध्ये श्रेयसने पहिलीपासून दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देशसेवेची आवड मनात ठासून भरल्यामुळे पुढील शिक्षण मिरजमधील रॉयल ऑफिसर्स प्रेप्रोविरिटी अकॅडमीमध्ये पूर्ण केले. याठिकाणी त्याला डॉ.गीतांजली शिंदे, सतीश पुणेकर, अमित पाटील, माधुरी नाईक यासह शिक्षक वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
देशसेवेचा मनाशी सारखा ध्यास असल्यामुळे वाचनाच्या आवडीतूनच त्याला चांगला मार्ग मिळाला. त्याने मुंबईमध्ये बांद्रा येथे स्टेज 1 ची परीक्षा दिली त्यानंतर मुंबईत कुलाबा येथे आयएनएस अँग्रेलो यासाठी सुद्धा परीक्षा दिली. या परीक्षेत त्याने चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला. कॉलेजमध्ये त्याने काही महत्ववाची जबाबदारीही सांभाळली असून अनेक उपक्रमांमध्ये त्याने सक्रिय सहभाग घेतला होता.
श्रेयशने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर मिळविलेले यश पाहून राणे कुटुंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतानाचे चित्र समोर आले. त्याला अनेकांनी कौतुकाची थाप दिली असून सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले आहे. पुढील काही दिवसात श्रेयस हा ओरिसा राज्यात चार महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी जाणार असून त्यानंतर तिथूनच त्याला पोस्टिंग मिळणार आहे. त्याचा प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द यामुळे तो सर्वांसाठी एक आदर्श बनला आहे.
स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा विकास साधत असताना देशसेवेला हातभार लावू शकण्यासारखे हे कार्य असल्याने कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाने कोणतेही ध्येय गाठता येते. यापुढे माझी जबाबदारी वाढणार असल्याने लेफ्टनंट, कमिशनर, मेजर सारख्या परीक्षेसाठी यापुढे मी प्रयत्नशील राहणार आहे.
-श्रेयश राणे







