| महाड | प्रतिनिधी
कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणारे महाड तालुक्यातील सापे-वामने हे महत्वाचे स्थानक असून महाड, पोलादपूर, मंडणगड येथून हजारो प्रवासी मोठ्या प्रमाणात याच स्थानकातून प्रवास करीत असून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे हे रेल्वे स्थानक समस्याचे केंद्रबिंदू ठरले आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे, हलगर्जीपणामुळे जीवितहानी होऊ शकते. अशा दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदारी घेणार आहे का? अशी आक्रमक मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी समाज माध्यमातून केली जात आहे. प्रवाशांच्या जीवाशी किती दिवस खेळणार? असा संतप्त सवाल प्रत्येक प्रवाशांकडून विचारला जात आहे.
सुरवातीला कमी गर्दी असलेले हे स्थानक आता हळूहळू गजबजू लागले आहे. मात्र, सापे-वामने स्थानकाच्या पुनर्विकास प्रक्रियेनंतर येथील स्थानकाच्या समस्या अजूनच गंभीर झाल्या आहेत. यामध्ये या रेल्वे स्थानकावर एकच फलाट असून, रेल्वे रूळ आणि फलाटातील अंतर जास्त असल्याने प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने प्लॅटफॉर्मची उंची अत्यंत कमी असल्यामुळे प्रवाशांना रेल्वेमध्ये चढणे-उतरणे जीवघेणे ठरत आहे. यामुळे जीवितहानी होण्याचे प्रसंग घडण्याची शक्यता प्रचंड वाढली असून ती नाकारता येत नाही.
स्थानकापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानकांत विजेची कमतरता असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना तिथून बाहेर येताना अडचण निर्माण होत आहे. रेल्वे अवारात कोणतेही खाण्याकरिता व लहान बालकास काही खाऊ घेण्यास दुकान नसल्याचे दिसत आहे, स्थानिकांना तिथे रोजगारासाठी काही जागा उपलब्ध करून द्यावी, यासोबतच स्थानिक भूमिपुत्रांनी दुकाने उभारावी असे स्थानिक प्रवासी वर्गाकडून मागणी होत आहे.
खा. सुनिल तटकरे, मंत्री भरत गोगावले, क्षेत्रीय रेल प्रबंधक शैलेश बापट, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांची कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई) शाखा महाड-पोलादपूर संलग्न युवक मंडळ आणि महिला तसेच आम्ही सापे, वामने, नडगाव शेतकरी बहुविकासीय सामाजिक संस्था यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सदर समस्येसह स्थानक विकासासाठीच्या प्रमुख मागण्या सादर केल्या. त्यावर आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली पाहायला मिळत नाही.
प्रवाशांचा नमस्ताप
पुढील महिन्यात कोकणातील सर्वात मोठा शिमगोत्सव येत असून, त्याकरिता प्रवासी वर्गाची मोठ्या संख्येने रेल्वेने ये-जा होणार आहे. जादा गाड्या देखील रेल्वे खात्याने सोडल्या आहेत. मात्र, दुदैवाने सापे-वामने रेल्वे स्थानकामध्ये चढण्या-उतरण्याकरिता प्रवाशांना मोठा नमस्ताप होतो. हा जीवघेणा प्रवास थांबणार कधी असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.







