पनवेल | वार्ताहर |
सोशल मीडियाचा सकारात्मकरीत्या वापर केल्यास त्याचा समाजाला मोठा फायदा होऊ शकतो हे कोविड अॅडमीन हेल्थ युनियनने दाखवून दिले आहे. इंस्टाग्राम होल्डर एकत्र येऊन राज्यभर कोरोना रुग्णांना एक प्रकारे मदतीचा हात देत आहेत. त्यांना विविध सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने यशस्वी प्रयत्न सामाजिक बांधिलकी जपणारे हे सदस्य समाज माध्यमांवर करीत आहेत.
सध्या कोरोना रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकाची प्राथमिक उपचारांसाठी प्रचंड धावपळ होत आहे.त्याचे होणारे हे हाल पाहून अखेर तरूण पिढी मदतीसाठी पुढे आली. करण परटक्के,रवी जाधव,मयुरेश भोंडीवले,दुर्गेश मनगटे आणि इतर काही तरूण ह्या सर्व इंस्टाग्राम होल्डर सोशल मीडियाद्वारे एकत्र येऊन सर्वांना एकत्र आणले आणि कोविड अॅडमिन हेल्प युनियन हा ग्रुप निर्माण झाला. इंस्टाग्राम वर सतत सर्वांसाठी तत्पर असणारे, सर्वांच्या हाकेला नेहमीच धावून येतात. त्यांच्या हाक तुमची,साथ आमची या ब्रीद वाक्यातून त्यांची समाजातील लोकांसाठी असलेली तळमळ दिसून येते. त्यांचा सोबतच आशिष खलाते , आशिष ओलिंबे,दत्ता झांबरे,अनिकेत पाटील,सागर धुमाळ यां सर्वांनी एकत्र येऊन कोरोना रूग्णांना मदत करण्याचा निश्चय केला
या इंस्टा अॅडमिन सोबत मुलीदेखील तेवढ्याच ताकदीने कामे करीत आहेत. वैष्णवी जगधने,सृष्टी कोकणे , निकिता सावंत, अवंतिका तमसेटवार, सुकन्या रायरीकर, आणि त्यांच्यासोबत काम करणार्या इतर मुलींनी या सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटा उचलला. सर्व कामं अधिक सोपस्कर होण्यासाठी इंस्टा होल्डरने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे विभाग काढले. या विभागानुसार अजूनही कामे चालू आहेत. रूग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, औषधे जास्तीत जास्त मिळवून द्यायचा ग्रुपने प्रयत्न केला.आजही हे काम अखंडपणे सुरू आहे.
हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर,पुणे, पिंपरी चिंचवड ठिकाणच्या संपूर्ण हॉस्पिटला ऑक्सिजन पुरवण्याचे काम ग्रुपने केले. 200हून अधिक रूग्णांना प्लाझ्मा मिळवून दिला. 500 हून अधिक रूग्णांना व्हेंटिलेटर,ऑक्सिजन बेड हॉस्पिटलसोबत स्वतः संपर्क साधून उपलब्ध करून दिले. काही गरजूंना आर्थिक मदतीची मागणी करतात. त्यांना देखील सर्वांकडून मदत गोळा करून नातेवाईकांकडे जमा केली जाते.
प्रत्येक दिवस नव्या उमेदीचा
प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने कामं सुरू करतात. याच्यामागे कोणतीही स्वार्थी अपेक्षा नसून रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांचा आनंदच खूप समाधान कारक आहे . कारण आम्हांला प्रत्येक पेशंटमध्ये आमचे आई वडील दिसतात अशी भावना या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केले. कोणत्याही कोरोना रूग्णांना मदत लागल्यास करण परटक्के : 9172988912 रवी जाधव:9156156145 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.