अलिबागमधील सहयोग पतसंस्थेतर्फे गौरव
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नागाव येथील गणेश कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय हरिश्चंद्र पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबागच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या मासिक सभेत अध्यक्ष योगेश मगर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
बेलकडे येथील रहिवासी असणारे पाटील यांचे राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. गेली अनेक वर्षे बेलकडे ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवले आहे. अलिबाग तालुका पंचायत समितीचे उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या सहयोग व्यापारी नागरी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, जनसंपर्क आणि कार्यतत्परता यांची दखल घेत त्यांची गणेश कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, पाटील यांनी आपल्या कुटुंबाच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील कार्यपरंपरेला स्वतःच्या कर्तृत्वाची जोड देत विविध जबाबदाऱ्यांवर यशस्वीपणे मजल मारली आहे.
पाटील यांच्या वडिलांनी अलिबाग पंचायत समिती सभापती, गणेश कृषक सेवा सोसायटीचे अध्यक्ष आणि बेलकडे ग्रामपंचायतीचे सरपंच अशी महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. वडिलांकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत पाटील यांनीही आपल्या कार्याच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामविकासापासून सहकार क्षेत्रापर्यंत विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या त्यांच्या अनुभवाचा लाभ गणेश कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या प्रगतीसाठी होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष मगर यांनी व्यक्त केला.






