। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विविधी गुन्हे दाखल असलेल्या कर्जत मधील तिघाजणांवर रायगड पोलिस दलाच्या वतीने हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीतून तीन महिने कालावधी करिता या तिघांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली आहे. सुफीयान इकबाल आढाळ, वय-29 वर्ष, हुसेन आरिफ नजे, वय-29 वर्ष, दोघेही राहणार दामत, ता.कर्जत, जि.रायगड, व संतोष बबन भुसारी, रा.वरई, ता.कर्जत, जि.रायगड यांच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाणे अभिलेखावर मालमत्तेचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये संबधीत न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने सुफीयान आढाळ, संतोष भुसारी, हुसेन नजे, यांच्या बेकायदेशीर कृत्यामुळे कर्जत परिसरात भय व दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सदर इसमांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 57 अन्वये कारवाई होण्याबाबत पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस अधीक्षकांनी या प्रस्तावाची दखल घेवुन सदरचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्याकडे सुनावणी व निर्णयाकरिता पाठविला होता. उपविभागीय अधिकारी कर्जत यांनी सदर प्रस्तावातील आरोपित यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून त्यांना यापुढे समाजात मोकळे राहून दिल्यास सर्वसामान्य जनतेत घबराटीचे दहशतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊन त्याचे जन माणसांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होतील. तसेच त्यांच्यापासून लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होवु नये याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 57 अन्वये रायगड जिल्ह्याच्या हद्दीतून तीन महिने कालावधी करिता हद्दपार केले आहे.