अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी; शिवसेना ठाकरे गटाची मागणी
। महाड । जुनेद तांबोळी |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावरील कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाहा उपस्थित होते. शाहांना खा. तटकरे यांनी आपल्या सुतारवाडीतील निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रित केले होते. या शाहीभोजनासाठी तब्बल एक कोटी 39 लाख रुपये सरकारच्या तिजोरीतून खर्च करण्यात आले. याबाबत हेलिपॅड बनवणार्या संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व लोकायुक्त तसेच महालेखा नियंत्रकांकडून चौकशी करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वय तथा महाड तालुक्यातल्या शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणावरून पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सुतारवाडी येथील शाही मेजवानीसंदर्भात हेलिपॅडवर झालेला खर्च सर्वसामान्यांच्या खिशातून भाववाढ करून हे सरकार वसूल करेल, अशी तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहेत. एकीकडे गाववाड्यांवर रस्त्यांची दुरवस्था असताना, तसेच मागील तीन वर्षांत राज्यातल्या ठेकेदारांनी केलेल्या कामांचे पैसे देणे ठेकेदारांना क्रमप्राप्त असताना केवळ हेलिपॅडसाठी एक कोटी 39 लक्ष एवढी रक्कम खर्च करणे, यावरून राज्यातील राजकारण आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघाले आहे. दक्षिण रायगड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा समन्वयक व महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी याबाबत म्हटले आहे की, निविदा पूर्ण होण्यासाठी व कोणताही कार्यारंभ आदेश न देता 9 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी 3/2025-26 अंतर्गत सुतारवाडी तालुका रोहा या ठिकाणी चार युनिट हेलिपॅड बांधणीचे काम 1.39 लाख रुपयांना मंजूर केले. यासाठी निविदा भरण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल होती व तांत्रिक निविदा उघडण्याची तारीख 16 एप्रिल होती. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर या हेलिपॅडचे काम पूर्ण केले, हे शासकीय नियमनाचे उल्लंघन नाही का? सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर या हेलिपॅड चे काम पूर्ण केले व तांत्रिकदृष्ट्या काम पूर्ण होण्याअगोदर 12 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता गृहमंत्री अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या खासगी निवासस्थानी जेवणावळीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, असा सवाल ओझर्डे यांनी दिलेल्या तक्रारीत विचारला आहे.
सुतारवाडी येथील शाहीमेजवानीचा कार्यक्रम अशासकीय नसून, खासगी असल्याने सार्वजनिक निधीचा वापर नियमबाह्य व बेकायदेशीर ठरतो. सुतारवाडी येथील हेलिपॅड बांधलेली जमीन ही खासगी मालकाची आहे. सुतारवाडी येथील हेलिपॅड ज्या जागेवर उभारण्यात आले, त्या जमिनीचे मालक लोकसभा सदस्य असून, भविष्यात त्या जमिनीचा वापर राजकीय किंवा खासगी फायद्यासाठी करण्याची शक्यता आहे. सुतारवाडी येथील शाही मेजवानीचा कार्यक्रम पार पडून आज दहा दिवसांचा कालावधी उलटला, मात्र तरीदेखील या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय घमाशान रायगड जिल्ह्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कायदेशीर कारवाई करावी
या संपूर्ण प्रकारात जिल्हाधिकारी, तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे थेट जबाबदार आहेत. त्यांची तात्काळ चौकशी करून प्रशासकीय तसेच वित्तीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जर कारवाई झाली नाही, तर याबाबत उच्च न्यायालयात याचिकाद्वारे मांडून जनतेच्या पैशाचा न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असा इशारा सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी किशन जावळे, महाडचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तसेच लोकायुक्त व लाड लुप्त प्रतिबंधक विभाग व महालेखा नियंत्रक यांना निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.