भारतात दीड लाख आत्महत्या; महाराष्ट्र राज्य आघाडीवर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतात आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली असून सन 2020 मध्ये 1,53,052 इतक्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने हा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, देशात घडणार्‍या आत्महत्येच्या घटनेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून सर्वाधिक आत्महत्या या कृषिक्षेत्रांसह संबंधित आहेत.
बदलत्या काळासोबत लोकांची मानसिकताही बदलत आहे. जगण्यातील संघर्षापेक्षा आत्मघात करून या काळचक्रातून सुटणेच, हल्ली सोयिस्कर वाटू लागले आहे. अर्थात, यांच्या कारणांची मिमांसा केल्यास विविध स्तरांतील धक्कादायक वास्तव समोर आल्यावाचून राहणार नाही. पण केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार एनसीआरबीने नोंदविलेला अहवाल धक्का देण्यासोबतच विचारसन्मुख करायला लावेल असा आहे.
या अहवालानुसार, सन 2020 मध्ये आत्महत्या नोंद होण्याचा सरासरी आकडा प्रतिदिन 418 इतका आहे. 2019च्या तुलनेत 2020 मध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. जगाच्या पटलावर कृषीप्रधान देश म्हणून नामलौकिक असणार्‍या भारतात कृषी क्षेत्रातील 10,677 लोकांनी आत्महत्या केल्या असून यामध्ये 5,579 शेतकरी तर 5,098 शेतमजूर यांचा असा समावेश आहे. याशिवाय यामध्ये सर्वाधिक पुरूषांचा समावेश असून आत्महत्या करणार्‍या शेतकरीमजुरांमध्ये 4,621 पुरुष आणि 477 महिला आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण आत्महत्येच्या संख्येपैकी हे प्रमाण सात टक्के इतके आहे.
आत्महत्येच्या या घटना सर्वाधिक महाराष्ट्रात नोंदविल्या गेल्या असून यांचे प्रमाण 19,909 इतके आहे. जे एकूण प्रकरणांच्या 13 टक्के इतके आहे. महाराष्ट्र राज्याखालोखाल तामिळनाडू – 16,883 आत्महत्या, मध्यप्रदेश – 14,578, पश्‍चिम बंगाल – 13,103 तर कर्नाटक – 12, 259 आत्महत्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

Exit mobile version