। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
डुबकी किंग ते प्रो-कबड्डीचा मेस्सी अशी ओळख बनवलेल्या प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) आठव्या हंगामाच्या लिलावात इतिहास रचला आहे. तो पीकेएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला यूपी योद्धाने 1.65 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले. सामन्यात चढाई करताना डुबकी हा डाव खेळण्यात प्रदीप तरबेज मानला जातो. त्यामुळे त्याला डुबकी किंग अशी ओळख मिळाली आहे.
पीकेएलच्या लिलावाच्या दुसर्या दिवशी, ए श्रेणीतील खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आणि प्रदीप नरवालचे नाव समोर येताच तेलुगू टायटन्सने प्रथम त्याच्यासाठी 1.20 कोटींची बोली लावली, त्यानंतर अनेक संघांनी प्रदीपला खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले. पण यूपी योद्धाने अधिक बोली सुरू ठेवली आणि प्रदीपला त्याच्या संघात समाविष्ट केले. तीन वेळा माजी चॅम्पियन पाटणा पायरेट्सला एफबीएम कार्डचा वापर करून पुन्हा एकदा प्रदीप नरवालला संघाल सामील करण्याची संधी होती, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे प्रदीप प्रथमच यूपी योद्धा संघाचा एक भाग बनला. त्याच्या आगमनाने संघाला खूप बळ मिळेल.प्रदीप नरवालने एकाच वेळी दोन स्वतंत्र प्रसंगी एका सामन्यात 30 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. असा हा पराक्रम त्याच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूने केलेला नाही. प्रदीप आतापर्यंत पीकेएलमध्ये बेंगळुरू बुल्स आणि पाटणा पायरेट्सकडून खेळला आहे.
लिलावातील अव्वल पाच खेळाडू
प्रदीप नरवाल (यूपी योद्धा) 1.65 कोटी
सिद्धार्थ देसाई (तेलुगू टायटन्स) 1.30 कोटी
मनजीत (तमिळ थलायव्हाज) 92 लाख
सचिन (पाटणा पायरेट्स) 84 लाख
रोहित (हरयाणा स्टीलर्स) 83 लाख