। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 1 ठार तर 6 जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल परिसरात झालेल्या पहिल्या अपघातामध्ये शिळफाटा-पनवेल महामार्गावर बीमा कॉम्प्लेक्ससमोर स्टील मार्केट कळंबोली येथे एका अनोळखी इसमाचा अपघात होऊन तो जखमी अवस्थेत पडला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सखोल माहिती घेतली. त्यांचे नाव, पत्ता शोधला असता त्याचे नाव अखिलेश नंदलाल कुमार (31) असे असून तो वावंजे येथे राहत असल्याचे समजले. अनोळखी वाहन चालकाने त्याला ठोकर मारून अपघात केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या घटनेत शहरातील अमरधाम स्मशानभूमी समोरील ठाणा नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षा, दुचाकी आणि सेलेरिओ कारमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक आणि रिक्षातील एक असे दोघेजण जखमी झाले. या अपघाताची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली. अपघात झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
तिसऱ्या अपघातात एक ट्रक (एमएच-12-क्युजी-3123) पुण्याकडून मुंबईकडे येताना रोडच्या डिव्हायडरवर आदळून विरुद्ध दिशाच्या लेनवरून येणाऱ्या किया कार (एमएच-43-सीजी-6898) या गाडीवर आदळून दुसऱ्या बाजूला पलटी झाला. किया कारमध्ये ध्रुवण भोजवानी हे त्यांच्या तीन मित्रासह टी पॉइंटकडून पळस्पा येथे डिझेल भरण्याकरिता जात असताना त्यांच्यावर ट्रक आदळला. त्यामध्ये ध्रूवन हे गंभीररित्या गाडीमध्ये अडकले होते व इतर तीन मित्र जखमी अवस्थेत बाहेर निघाले होते. घटनास्थळी पनवेल शहर ट्रॅफिक पोलीस स्टेशनचे पोलीस जी.एम. मुजावर, पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक आर.बी. पाटील हे हजर होते. किया कारमध्ये अडकलेल्या ध्रुवन भोजवानी (26) यांना सिडको अग्निशमन केंद्र नवीन पनवेल येथून फायर इंजिनवर रेस्क्यू व्हॅनसह ड्रायव्हर एस.बी. निकम, लीडिंग फायरमन के ए राठोड, फायरमन एस. एम. पड्याळ, बी.एस. पाटील, जे. के. पाटील, जी.पी. गडगे, के. एम. कोळी यांनी रेस्क्यू टूलचा वापर करून गाडीमधून सुखरूप बाहेर काढून हॉस्पिटलला रवाना केले.