| नवी मुंबई | प्रतिनिधी |
लोकाभिमुख प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्षा’त स्थापनेपासून आतापर्यंत एकूण 1 हजार 782 अर्ज निकाली काढल्याची माहिती महसूल उपायुक्त तथा कोकण विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मकरंद देशमुख यांनी दिली आहे.
सर्वसामान्य माणसाला त्याचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले गाव, शहर सोडून मुंबईला यावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचावेत या हेतूने 20 जानेवारी 2020 रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापित करण्यात आले होते. 20 जानेवारी 2020 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत कोकण विभागाच्या विविध ठिकाणांहून मुख्यमंत्री यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज, निवेदने असे एकूण 1 हजार 782 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 506 अर्ज क्षेत्रीय कार्यालयांकडे पाठवण्यात आले. तसेच 262 अर्ज मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडे पाठवण्यात आले; तर 1 हजार 14 अर्ज क्षेत्रीय कार्यालयाकडून निकाली काढून घेण्यात आले आहेत.