| चिरनेर | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला क्रांतिवीर महोत्सव शिरढोण येथील मांटाण मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. या क्रांतिवीर महोत्सवाला 19 जानेवारीपासून सुरुवात होणार असून, हा महोत्सव 28 जानेवारीपर्यंत चालणार आहे. सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.
19 जानेवारी रोजी जगदीश पाटील प्रस्तुत ठाणा बँन्ड आर्केस्ट्रा सादर होईल. 20 जानेवारी रोजी शालेय नृत्य स्पर्धा सादर होतील. 21 जानेवारी रोजी सनी संते प्रस्तुत मी डोंबिवलीकर हीच खरी आगरी कोळ्यांची दौलत आर्केस्ट्रा सादर होईल. 22 जानेवारी रोजी एकेरी नृत्य स्पर्धेत लिंबू कापला फेम मयूर नाईक यांची उपस्थिती रसिकांना पहायला मिळणार आहे. 23 जानेवारी रोजी अष्टगंध कला मंच उरण यांच्या वतीने पैशाने तुटली नाती हे आगरी कोळी भाषेतील नाटक सादर करण्यात येणार आहे. 24 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नामांकित ग्रुप डान्स तर्फे नृत्याचा अविष्कार सादर होईल. 25 जानेवारी रोजी स्टेप आर्ट प्रस्तुत जल्लोष सुवर्ण युगाचा हा नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. 26 जानेवारी रोजी महिलांसाठी मंगळागौर व पारंपारिक फेर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 27 जानेवारी रोजी शृंगाररस लावणीचा या लावणी नृत्यातून लावण्यवती लावणीची अदाकारी सादर करणार आहेत. 28 जानेवारी रोजी परमेश माळी प्रस्तुत यो तो माळी आर्केस्ट्राचा नजराणा रसिकांना पहायला मिळणार आहे.
विशेषता प्रत्येक दिवशी महिलांसाठी पैठणी, तर लहान मुलांसाठी सायकल आणि पुरुषांसाठी स्मार्ट वॉच, लकी ड्रॉ मधून देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.