विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी 10 दिवसांची मुदत – शेकाप

। पोलादपूर । वार्ताहर ।
तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युतप्रवाह तासाभरात सरासरी दोन मिनिटाला एकवेळ बंद होऊन सुरू होत असल्याच्या प्रकारामुळे अनेकांची विद्युत उपकरणे नादुरूस्त होत असल्याने भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून बुधवारी सर्वपित्री आमावस्येच्या मुहूर्तावर महावितरणला पोलादपूर तालुक्यातील विद्युतपुरवठा सुरळीत करा अन्यथा 10 दिवसांनंतर मोठया प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.पोलादपूर तालुक्यातील विद्युतपुरवठयासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांचे दूर्लक्ष सुरू असल्याने महावितरणच्या अभियंत्यांचे चांगलेच फावले आहे. पोलादपूर तालुक्यातील विद्युत ग्राहकांचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा स्थानिक पुढारी आणि राजकीय पक्षांकडून आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पोलादपूर पंचायत समितीच्या निवडणुका डोळयांसमोर ठेऊन आपआपल्या वर्चस्वाखालील ग्रामपंचायतींची बिले थकीत असूनही रस्त्यावरील विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अधिकार्‍यांचे लांगूलचालन करीत आहेत. त्यामुळे पोलादपूर तालुका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, विभागीय चिटणीस योगेश महाडीक, बोरावळे सरपंच वैभव चांदे, जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य चंद्रकांत सणस, अल्पसंख्यांक जिल्हा सेल समीर चिपळूणकर व यासीन करबेळकर, रवींद्र गायकवाड, नासिर नाडकर, इम्तियाज तांबे, प्रमोद महाडीक, रझाक तुडीलकर, राशीद काझी, संकेत जैतपाल, इम्रान तिवडेकर, मसूद तिवडेकर, हर्षल सातपुते, प्रमोद शिंदे, अस्लम करबेलकर आदी कार्यकर्त्यांनी पोलादपूर महावितरणच्या कार्यालयामध्ये जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता महावितरणचे सर्व अभियंता व जबाबदार अधिकारी कार्यालय सोडून पसार झाले. यावेळी शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी पसार होणार्‍या अभियंत्यांसह महावितरणला येत्या 10 दिवसांमध्ये पोलादपूर तालुक्याचा विद्युतपुरवठा सुरळीत न झाल्यास मोठया उग्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्याची तबी निवेदनाद्वारे दिली.

Exit mobile version