परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेच्या 10 स्पेशल गाड्या

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या मार्गावर दहा स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान या मार्गावर या गाड्या चालविल्या जाणारा असून कोकण रेल्वेचा हा निर्णय म्हणजे चाकरमान्यांना गणपती पावल्यासारखा आहे. 10 सप्टेंबरपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात हजारोच्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल गाड्या चालविल्या होत्या. या गाड्यांमुळे हजारो गणेशभक्त गणेशोत्सवासाठी वेळेत आपापल्या गावी पोहचू शकले होते. 11 सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणरायांना निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी पाच दिवसांच्या गणरायांना निरोप दिल्यावर मोठ्या संख्येने चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वेने 16 ते 20 सप्टेंबर या दरम्यान तब्बल दहा स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version