। महाड । वार्ताहर ।
माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत दुर्दैवी अशी घटना महाड तालुक्यातील आदिस्ते या ठिकाणी घडली असून सदर घटनेने महाड तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून एका महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेनंतर महाड तालुका पोलिसांचं सर्व पथक या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र तपास करीत असून यातील महिलेच्या मारेकर्यांना शोधण्यासाठी पोलिसांचे 10 पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील आदिस्ते गावातील ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच मिनाक्षी खिडबिडे वय-40 हि महिला सोमवारी दुपारच्या सुमारास लाकडे आणण्यासाठी गावालगतच गेली होती.दरम्यान कुणीतरी अज्ञातांनी या महिलेच्या डोक्यात मागच्या बाजूला कोणत्यातरी हत्याराने तिला जखमी केली. त्यानंतर सदर महिलेला एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन घटनास्थळावरुन खेचत नेऊन बाजूला असलेल्या बांबूच्या बेटाजवळील मोकळ्या जागेत घेऊन सदर महिलेवर अज्ञात व्यक्तींनी बलात्कार करण्यााचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान बाजूलाच पडलेल्या दगडाने किंवा इतर कोणत्यातरी हत्याराने महिलेला डोक्यावर जबर दुखापत करुन तिला जीवे मारण्यात आले आहे. सदरची घटना ही नेमकी कशामुळे घडली याचा शोध महाड तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घेत आहेत. खून झालेली महिला ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरपंच असून ही घटना नेमकी राजकीय वादातून झाली किंवा अन्य कुठल्या कारणाने झाली याबाबत दोन दिवसांपासून एकच उलटसुलट चर्चा सुरु असल्याचे ऐकायला मिळत आहे. मृतदेह तपासणीसाठी मुंबईत पाठविण्यात आला. सदर घटनेची माहिती महाड तालुका पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान बघता बघता परिसरातील नागरिक देखील त्या ठिकाणी जमा झाले होते. सदर घटनेबाबत पोलिसांनी रितसर पंचनामा करुन मृतदेह तपासणीसाठी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची घटनास्थळी धाव!
महाड तालुक्यातील आदिस्ते गावामध्ये घडलेल्या या खूनाच्या घटनेने तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे त्याचबरोबर महाडचे डिवायएसपी निलेश तांबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांची 10 पथकं आरोपींच्या मागावर!
सरपंच महिलेची हत्या ही कदाचित बलात्काराच्या प्रकारातून झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेतील आरोपींना शोधून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनासह महाड तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी आरोपींचा शोध घेत असून खरंतर या घटनेतील मुख्य आरोपींना पकडणं हे महाड तालुका पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हान असून महिला सरपंचाचा खून करणार्या मारेकर्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 10 पथकं तैनात करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या प्रकरणी जयदास कमलाकर जाधव (पोलीस पाटील), राहणार आदिस्ते यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून महाड तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात कॉ. गुन्हा रजिस्टर नंबर 87/2021 भादंवी संहिता कलम 302, 376, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महाड तालुका पोलीस करीत आहेत.
आरोपींवर कठोर कारवाई करा, नातेवाईकांची मागणी!
एका महिला सरपंचावर बलताकाराचा प्रयत्न करण्यात येऊन निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची अत्यंत दुर्दैवी अशी घटना महाड तालुक्यातील आदिस्ते उबटआळी रस्त्यावर घडल्यानंतर आदिस्ते परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेतील आरीपींवर कठोर कारवाई यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणच्या संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तसेच मिनाक्षी खिडबिडे यांचे पुत्र सचिन यांनी पोलिसांकडे केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सौ. मिनाक्षी खिडबिडे या महाड तालुक्यातील आदिस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच असून येत्या 2 जानेवारीला त्यांच्या मुलाचे लग्न आयोजित करण्यात आले होते. दरम्यान ही अशी घटना घडल्यानंतर आदिस्ते परिसरासह सर्वत्र जणूकाही दुःखाचा डोंगर कोसळला असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
महिला सरपंचाची निर्घृण हत्या, आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांच्या 10 टिम तैनात!
