पांड्यासाठी 100 कोटी खर्च?

मुंबईनं गुजरातला दिली मोठी ट्रान्सफर फी

| मुंबई | प्रतिनिधी |

इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावाआधी मुंबई इंडियन्सनं त्यांचा माजी खेळाडू हार्दिक पांड्याला संघात घेतलं. त्यासाठी गुजरात टायटन्ससोबत ट्रेड करण्यात आला. या निर्णयानं अनेकांना धक्का बसला. पाचवेळा आयपीएल जिंकणार्‍या मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सला 2022 मध्ये विजेतेपद मिळवून देणार्‍या हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजले. पण पांड्याच्या पगारापेक्षा अधिक रक्कम गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फीज म्हणून मिळाली. मुंबईनं तब्बल 100 कोटी रुपये मोजून हार्दिकला आपल्या ताफ्यात दाखल केल्याचं वृत्त आहे. त्याची माहिती केवळ आयपीएलच्या गव्हर्निंग समितीला होती. मात्र, आता या रकमेचा उलगडा झाला आहे.

हार्दिक पांड्यासारख्या तगड्या खेळाडूला सोडण्यासाठी गुजरातने 100 कोटींची रक्कम मागितली असेल, असे अनेकांचं मत आहे. मुंबई इंडियन्सकडून 100 कोटी रुपये ट्रान्सफर फीज मिळाल्यानं गुजरात टायटन्सचं व्हॅल्यूएशन 100 कोटी रुपयांनी वाढणार आहे. आयपीएलमध्ये पांड्या सर्वप्रथम मुंबई इंडियन्सकडूनच खेळला. पांड्याचा समावेश असलेल्या मुंबईनं चारवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. आयपीएल 2022 साठी मुंबईनं त्याला रिटेन केलं नाही. गुजरात टायटन्सनं त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं. संघाला पहिल्याच फटक्यात विजेतेपद जिंकून देत त्यानं आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली. त्यामुळेच हार्दिक पांड्याला मुंबईत ट्रेड करणं गुजरातसाठी खूपच कठीण निर्णय होता. मुंबईकडून 100 कोटींची ट्रान्सफर फी घेतलेल्या गुजरात संघाच्या मुल्यांमध्ये आता तेवढीच वाढ झाली आहे. पुढील वर्षी संघाचे खाते बंद झाल्यावर संघाचे मुल्य 100 कोटींनी वाढणार आहे.

Exit mobile version